Dharmendra Pradhan Resignation Letter
नवी दिल्ली : नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर करत दोन पानांचे पत्र प्रसिद्ध केले असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भावना, देशहित आणि लोकशाहीवरील विश्वास यांचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणानंतर गेल्या दीड महिन्यापासून जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. CJP (कॉकरोच जनता पार्टी)च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभे राहिले होते. आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांनी तब्बल २० ते २२ दिवस उपोषण केले होते. या संपूर्ण आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ही होती.
केंद्र सरकार आणि CJP यांच्यातील तिसऱ्या फेरीच्या चर्चेपूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेले हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. (Dharmendra Pradhan Resignation Letter)
राजीनामा पत्रात धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, “माझ्या तरुण सहकाऱ्यांनो, मी गेल्या चार दशकांहून अधिक काळ विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा यासाठी स्वतःला समर्पित केले आहे. सक्षम, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्था हीच मजबूत राष्ट्राचा पाया असते, यावर माझा नेहमीच ठाम विश्वास राहिला आहे.”
ते पुढे म्हणतात की, “मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या न्याय्य अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील युवा पिढीची स्वप्ने साकार करणे हा आपल्या सर्वांचा नैतिक संकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.” (Dharmendra Pradhan Resignation Letter)
पत्रात त्यांनी नीट-यूजी 2026 परीक्षेतील गैरप्रकाराचाही उल्लेख केला आहे. ३ मे २०२६ रोजी झालेल्या परीक्षेत काही गैरप्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ तपास सीबीआयकडे सोपवला, परीक्षा रद्द केली आणि नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. यासोबतच पुढील वर्षापासून परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला.
धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिले आहे की, २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा सुरळीत पार पडावी, ही सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता होती. केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून २१ जून २०२६ रोजी परीक्षा यशस्वीरीत्या पार पडली.
पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, “पहिल्याच दिवसापासून मी या प्रकरणाची पूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे. कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे भविष्य परीक्षा माफियांच्या हाती जाऊ देणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, हा माझा ठाम निर्धार होता.”
१६ जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट-यूजी निकालाचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, गरीब आणि सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले. मात्र, “या काळात काही जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा आणि आंदोलन अधिक चिघळवण्याचा प्रयत्न केला. गेल्या दहा दिवसांतील घडामोडी पाहून माझं मन अत्यंत व्यथित झालं आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय मुळीच नाही.” (Dharmendra Pradhan Resignation Letter)
राजीनाम्याचे कारण स्पष्ट करताना त्यांनी लिहिले आहे की, “भारताची युवाशक्ती ही देशाची खरी ताकद आहे. देशातील परिस्थितीचा कोणत्याही राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये, देशाची एकता अबाधित राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणीत सापडू नये आणि विद्यार्थ्यांनी आपला अमूल्य वेळ आंदोलनाऐवजी शिक्षण व करिअर घडवण्यासाठी द्यावा, या विचाराने मी माझा राजीनामा पंतप्रधानांकडे सोपवला आहे.” (Dharmendra Pradhan Resignation Letter)
शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी, मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत, राष्ट्रसेवा हीच आपल्या आयुष्याची सर्वोच्च प्राथमिकता असून भविष्यातही भारतमाता, ओडिशा आणि देशातील तरुणांच्या स्वप्नांसाठी कार्यरत राहणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या चर्चेला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
Dharmendra Pradhan Resignation Letter

