पाचोरा तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडून पाहणी
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जलसंपदा व जलव्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी पाचोरा तालुक्यातील वेरुळी खु., वाडी-शेवाळे, शिंदाड, सातगाव डोंगरी या अतिवृष्टी व पुरग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.
अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड, पशुधनाची हानी, संसारोपयोगी साहित्य व धान्याचे नुकसान तसेच ग्रामीण भागातील रस्ते व पुलांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आढळले.
या पाहणीवेळी पालकमंत्री गिरीष महाजन यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी प्रशासनाला तातडीने खालील उपाययोजना करण्याचे निर्देश दिले –
शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत.
नुकसान झालेल्या रस्ते व पूल दुरुस्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
या पाहणीदरम्यान आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.

