नाशिक : Nashik Trimbakeshwar बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गोदावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर देखील अनेक भाविक जातात.
आंध्र प्रदेशातील मैतर रामराव भैरवी (वय 73, रा. वेरवनापट्टी, आंबूगाम, आंध्र प्रदेश) हे मंगळवारी दुपारी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वतावर गेले. जटा मंदिराकडे गेल्यानंतर पुढे जाताना ते वाट चुकले आणि चुकून दुर्गभंडार किल्ल्याकडे गेले. अवघड वाटेमुळे तेथेच अडकून पडले.
सायंकाळच्या सुमारास त्यांनी मदतीसाठी आवाज दिला. स्थानिक आणि मेटघर किल्ला पोलिस पाटील यांनी लक्षात घेतलं व त्वरित (Nashik Trimbakeshwar) त्र्यंबकेश्वर पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी हवालदार सचिन जाधव, शिपाई अमोल बोराडे, नंदकुमार मुसळे यांना ब्रह्मगिरीकडे रवाना केले. तसेच नाशिक येथून 12 सदस्यांची रेस्क्यू टीम पाचारण करण्यात आली.
शोध मोहिमेदरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृतदेह दुर्गभंडार किल्ल्याजवळील गोरक्षनाथ गुफेत, सुमारे 300 फूट खोल मिळून आला. प्राथमिक माहितीनुसार, पाय घसरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.
पोलिसांचं आवाहन:
ब्रह्मगिरी पर्वत हा दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला आहे आणि रस्ते सहज लक्षात येत नाहीत. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांनी किंवा पर्यटकांनी एकटं जाणं धोकादायक असल्याने स्थानिकांची मदत घेऊनच जाण्याचं आवाहन पोलिस व स्थानिक नागरिकांनी केलं आहे.

