Nashik Rickshaw Drivers Bengali Baba Mahaprasad
नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे-शिंदे शिवारात असलेल्या ओम चैतन्य बंगाली बाबा देवस्थानात श्रावण महिन्यानिमित्त रिक्षाचालकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही भक्तिभावाने पार पडली.
ओम चैतन्य बंगाली बाबा हे परिसरातील जागृत देवस्थान म्हणून भाविकांमध्ये श्रद्धेचे स्थान आहे. सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या या देवस्थानाबाबत ‘हिंदू हो या मुसलमान, बंगाली बाबा सबका ध्यान’ अशी भावना भाविकांमध्ये पाहायला मिळते.
नाशिक रोड ते चिंचोलीदरम्यान रिक्षा व्यवसाय करणाऱ्या अनेक चालकांची बाबांवर विशेष श्रद्धा आहे. आपल्या व्यवसायाची सुरुवात बाबांचे दर्शन आणि पूजा-अर्चा करून करण्याची प्रथा अनेक रिक्षाचालक आजही जपत आहेत. याच श्रद्धेतून सुमारे ३० वर्षांपूर्वी सुरू झालेली श्रावणातील महाप्रसादाची परंपरा आजच्या पिढीतील रिक्षाचालकांनीही पुढे सुरू ठेवली आहे.
महाप्रसादाच्या कार्यक्रमामुळे देवस्थान परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रिक्षाचालकांनी बाबांना हार, फुले आणि चादर अर्पण करून आरती केली. पूजा-अर्चेनंतर भाविकांनी दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला. पळसे, शिंदे आणि परिसरातील नागरिकांसह मोठ्या संख्येने भाविक कार्यक्रमात सहभागी झाले. _ Nashik Rickshaw Drivers Bengali Baba Mahaprasad
नाशिक रोड ते चिंचोली मार्गावर रिक्षा चालविणारे चालक आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित होते. श्रद्धेसोबतच सामाजिक सलोखा आणि एकोप्याची भावना या आयोजनातून अधोरेखित झाली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बाळासाहेब सरोदे, दिलीप चौधरी, अनिल गायधनी, सोनू नरवडे, शिवनाथ गायधनी, कृष्णा गायधनी, लाला साबळे, रमेश गायखे, माऊली थोरात, तानाजी बोराडे, जगन गायखे, उत्तम गुरव, शिवाजी जाधव, भाऊसाहेब गायधनी, सुभाष बोराडे यांच्यासह स्व. अजितदादा पवार सामाजिक संस्थेचे सचिव बाळासाहेब छबुराव गायधनी आणि असंख्य रिक्षाचालकांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी – सोपान रणपिसे _ Nashik Rickshaw Drivers Bengali Baba Mahaprasad

