Young Leader Award 2026 At Hire College Nashik
नाशिक | MHDU News
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथे संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. स्मिताताई प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ‘यंग लीडर अवॉर्ड’ कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक स्वाती कांदळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावरच यश संपादन करता येते. अपयश ही यशाची पहिली पायरी असून प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने संकटांवर मात करत पुढे वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करत सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचा सल्ला दिला. मोबाईल वापरताना कोणालाही ओटीपी, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, सायबर फसवणुकीपासून सावध राहावे तसेच महिलांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. हरिष आडके यांनी सांगितले की, प्रमुख अतिथी स्वाती कांदळकर या महाविद्यालयाच्या सन २००४ च्या माजी विद्यार्थिनी असून तब्बल २२ वर्षांनंतर त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या महाविद्यालयात उपस्थित राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशस्वी वाटचालीचा आदर्श घेऊन प्रत्येक संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी डॉ. स्मिताताई हिरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या कार्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना अशा उपक्रमांमुळे नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि विविध कौशल्यांचा विकास होतो, अशी भावना व्यक्त केली.
संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. स्मिताताई हिरे या सामाजिक, शैक्षणिक, सहकारी आणि सार्वजनिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करत असून त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन समाजाभिमुख नेतृत्व विकसित करावे.
समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी विकसित व्हावी यासाठी महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येतात. अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारे असे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. राकेश पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रकाश शेवाळे, अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सरला सानप तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
Young Leader Award 2026 At Hire College Nashik
🏆 ‘यंग लीडर अवॉर्ड’ स्पर्धेतील विजेते
कनिष्ठ विभाग :
वरिष्ठ विभाग :
गंगापूर धरणात 70.69% पाणीसाठा; तरीही शनिवारी पाणीपुरवठा बंद, निर्बंध हटविण्याची नाशिककरांची मागणी

