Saptashrungi Kojaagari Festival
वणी (नाशिक): लाखो भाविकांच्या जयघोषात, घुंगरांचा छनछनाट आणि डफ-ताशांच्या निनादात सोमवारी (ता. ६ ऑक्टोबर) सप्तशृंगगडावर ‘कोजागरी पौर्णिमे’चा उत्साह ओसंडून वाहत होता. देशभरातून आलेल्या हजारो पदयात्रेकरू आणि कावडधारकांच्या गर्दीने गड भाविकांनी भरून गेला होता. (Saptashrungi Kojaagari Festival)
‘कोजागरी’च्या पूर्वसंध्येलाच नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता पदयात्रेकरूंनी गजबजून गेला होता. खासगी वाहनांमुळे घाटरस्त्यावर कोंडी निर्माण होऊन चार ते पाच तास वाहने अडकली, यामुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला.
सोमवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी सातला देवीच्या सुवर्णालंकारांचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली. पंचामृत महापूजेनंतर आदिमायेस आकाशी रंगाचे महावस्त्र, सोन्याचा मुकुट, चांदीचा कमरपट्टा, सोन्याची नथ, मंगळसूत्र, हार, मयूरहार आदी आभूषणांनी साजशृंगार करण्यात आला.
सकाळी दहापासून कावडधारकांनी आणलेले गोदावरी, भीमा, मुळा, मुठा, चंद्रभागा, प्रवरा, तापी, नर्मदा, क्षिप्रा तसेच अरबी समुद्राचे जल विशेष पूजेसाठी स्वीकारण्यात आले. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात आणि देशभरातील भाविकांनी सहभाग घेतला.
दीर्घ प्रतीक्षेनंतरही भाविकांचा उत्साह कमी झाला नाही. पौर्णिमेच्या चांदण्यात तेजोमय आदिमायेच्या दर्शनाने भाविक तृप्त झाले. महाप्रसादाचा लाभ सुमारे १५ हजारांवर भाविकांनी घेतला.
गर्दी लक्षात घेऊन ट्रस्टने प्रत्येक मिनिटाला ४० ते ५० भाविक दर्शन घेऊ शकतील अशी व्यवस्था केली होती. रात्री नऊ वाजता अभिषेक महापूजा जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा सप्तशृंगीदेवी ट्रस्टचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या हस्ते पार पडली. रात्री बारा वाजता देवीचा महाअभिषेक, नववस्त्र आणि साजशृंगारानंतर महाआरतीने कोजागरी उत्सवाचा समारोप झाला.
Saptashrungi Kojaagari Festival



[…] […]