पुणे शहरात रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि संपूर्ण शहर ठप्प झाले. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुख्य रस्त्यांवर पाणी साचून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन करत नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली.
सोमवारी सकाळी पावसाला थोडा विराम मिळाला होता, परंतु दुपारनंतर पुन्हा जोरदार सरी कोसळू लागल्या. रेनकोट किंवा छत्री न घेता बाहेर पडलेल्या नागरिकांना अचानक आलेल्या पावसामुळे आडोशाला थांबावे लागले. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आणि वाहतूक कोंडी तीव्र झाली.
पावसाचा फटका केवळ मध्यवर्ती भागालाच बसला नाही, तर धायरी, हडपसर, वाघोली, खराडी, चंदननगर, कॅम्प, औंध आणि बाणेर परिसरातही मुसळधार पावसाच्या सरींनी हजेरी लावली. काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
याआधीच खड्ड्यांनी विद्रुप झालेले रस्ते या पावसामुळे आणखी खराब झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीला रस्त्यांची डागडुजी झाल्याचा दावा महापालिकेकडून केला जातो; मात्र काही तासांच्या पावसातच हे दावे खोटे ठरत आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या तरी खड्डे बुजवले जात नाहीत. महापालिका केवळ टेंडर काढून कंत्राटदारांना पैसे घालवते; मात्र प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता शून्य असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

