Ind vs Pak Asia Cup 2025
आशिया चषक 2025 सुपर-4 फेरीतील भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने वादळी फलंदाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपले. भारताने हा सामना 6 विकेट्सने जिंकत पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवले.
👉 अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी:
172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला मैदानात उतरले. अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत दमदार सुरुवात केली. चारही बाजूंनी चौकार-षटकारांचा वर्षाव होत होता.
नवव्या षटकातच भारताने शतक गाठलं. अभिषेक शर्माने फक्त 24 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण करत पाकिस्तानला दबावाखाली टाकलं. त्याने अखेर 39 चेंडूत 74 धावा केल्या ज्यामध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. या जबरदस्त खेळीमुळे त्याला सामनावीर (Player of the Match) पुरस्कार मिळाला.
👉 मैदानावरील तापलेले क्षण:
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांची पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी (Shaheen Afridi) याच्याशी बाचाबाची झाली. अभिषेकने शाहीनच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. हारिस रौफलाही (Haris Rauf) गिल आणि अभिषेकने स्लेज केलं. सामना संपल्यानंतर अभिषेक म्हणाला –
“मैदानावर आम्ही मागे हटत नाही, जो समोर येतो त्याला योग्य उत्तर मिळतं.”
👉 सूर्यकुमार यादवचं विधान: सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला –
“क्रिकेटच्या इतिहासात एकेकाळी भारत-पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी मानले जायचे, पण आता रेकॉर्ड पाहता तसं म्हणता येणार नाही.”
या सामन्यामुळे भारताने सुपर-4 मधील आपली स्थिती मजबूत केली असून चाहत्यांनी सोशल मीडियावर जल्लोष करत टीम इंडियाचे कौतुक केले.

